बापट काका
बापट काका
आमच्या आक्षीच्या घराच्या पुढेच ५मिनिटावर एक शंकराचं मंदिर होतं, घरालाच जोडलेलं असं आणि घरातच पुढचा भाग दुकानात 'एडजस्ट' केलेला... म्हणजे बघा घर-मंदिर-दूकान... हे सगळं एकाच वास्तुत, कमाले नई! इंदुताइंच दूकान म्हणून प्रसिद्ध होतं ते, असो... त्याच वास्तू समोर एक वाडी होती, बहुतेक सर्वांची घरं रस्त्याच्या जवळ होती, पण त्या वाडीतलं घर जरा रस्त्यापेक्षा लांब, आणि जुने ही नव्हते... म्हणजे ८०सालात वगैरे बांधलेले... त्यातल्या त्यात नवीन, कारण गावात आरामात ७०-८०वर्ष जुनी घरं असतात, तर ते घर होतं बापट काकांच, तसे होते ते खुप म्हातारे, पण येणारे जाणारे सर्व बापट काका म्हणून हाक मारायचे, मग मी ही.
माझी आजी दूध घेऊन ५-६घरांत जाऊन द्यायची, आमच्या कडे २म्हशी होत्या तेव्हाची गोष्ट, तीन्हीसांजाच्या वेळी, ना धड उजेड ना काळोख... आजीचा हात किंवा पदर धरून जायचो, बापट काकांकडे पण जायचो, रस्त्याच्या लगद नसल्यानी आत पर्यंत जाऊन त्याना हाक मारून तो स्टीलचा डबा द्यायचा मग ते आपल्या घरच्या भांड्यात आतून घेणार... असा दिनकर्म(क्रम)... मला बघुन भुवया उंचावून हसायचे आणि मग आजीकडे माझ्या आईची, मामा, अजोबांची विचारपूस करायचे, त्यांच्या दारात उभे राहिले की त्यांची आतली खोली दीसायची, खुप ग्रन्थ, भिंतीवर सूर्यनमस्कारचे क्रम असलेले पोस्टर, काही साधू संत वगैरेंचे जुने-जीर्ण फोटोज... जमिनीवर वाघाची कातडी (खरी की कार्पेटवाली ते आठवत नाही) आणि रंगांचे डबे, १०किलोवेटचा दीवा बाहेर आणि आत पांढरा शुभ्र ट्यूबचा लक्ख प्रकाश!
ते एका जुन्या हिंदी कलवंतासारखे दिसायचे हे आजच मला कळले, नावच आठवेना... शेवटी गूगल वर जरा परिश्रम केले... मिळाले नाव, नाव आहे विनोद नागपाल. 'हम लोग' नावाच्या सिरिअल मध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे, तर तो कलाकार हुबेहूब बापट काकांसारखा, कुरळे केस, मोठा चश्मा, कायम खाकी चड्डीत... संघाचा पोशाख! हो हो अगदी संघातलेच वाटायचे! जाम भीती वाटायची त्यांना पाहिलं की.
एके दिवशी दुपारी जेवण झाल्यावर टायर नी काठी घेऊन उनाडत होतो, बापटांच्या अंगणाचा दरवाजा उघडा दिसला म्हणून घुसलो... त्यांच्या घराचाही दरवाजा उघडा होता! आत डोकावलं...
एके दिवशी दुपारी जेवण झाल्यावर टायर नी काठी घेऊन उनाडत होतो, बापटांच्या अंगणाचा दरवाजा उघडा दिसला म्हणून घुसलो... त्यांच्या घराचाही दरवाजा उघडा होता! आत डोकावलं... आत ही कोणी नाही, 'खाच खाच' असा आवाज येत होता, मला काही कळेना की आवाज कुठून येतोय, मी आत घुसलो, वाघाच्या खऱ्या कातडीवर पाय पडला... पहिल्यांदाच अनुभवलेले! पण तो 'खाच खाच' असा घावांचा आवाज वाढू लागला, जवळच असलेल्या डीपीचा आवाज पण सतत् त्या आवाजात भलताच सस्पेंस घुसवत होता, २ खोल्यांचं ते घर, त्या २ मिनटात माझी अशी विचित्र अवस्था झालेली, तरीही मी घारतल्या त्या मागच्या दरवाज्यापर्यंत मजल मारली, तो खाच खाच आवाज कुठून येतोय, नक्की काय चालूए याची मला भीती+उत्सुकता , दरवाज्याला लागूनच असलेल्या त्या मोठ्या पायऱ्या उतरून मी त्या प्रचंड हिरव्या गार परिसराच्या स्वाधीन झालो, ही मोठी मोठी नाराळाची झाडी, आंबा, फणस... खूप पाला पाचोळा, एका केळीच्या झाडा मागून येत होता आवाज, अचानक तो आवाज थांबला... त्या आवाजामुळे थरथरणारी केळीची पानं ही स्तब्ध झाली, माझे पाय ही थांबले, पाच सेकंद फक्त डीपीचा तो टीर्र् असा आवाज!
कोयता घेऊन एक माणूस त्या झाडांमधुन बाहेर आला.. त्याचे डोळे माझ्यावर स्थिरावणार तितक्यात माझ्यामागे कोणीतरी आहे हे मला त्या माणसाच्या डोळ्यांच्या हालचालीवरून कळाले, मी ही वळून पाहिले, मागे बापट काका उभे होते!
मी त्यांना काय झाले ते सांगणार इतक्यात तो माणूस बापट काकांना उद्देशून बोलायला लागला... "९नारल सोल्लून ठवलनीती, लास्टचा रहिलान! मग हीरीचा पंप लौतो"
मनात काय काय भलते सलते विचार आलेले क्षणात गायब! तो माणूस इतका वेळ नारळ सोलत होता... त्याचा तो 'खाच खाच' आवाज! बापट काकांनी पंजा दाखवून त्या माणसाला उरलेला नारळ सोलून पुढचे काम करायला सांगितले. माझ्याकडे पहात... 'काय घारू अण्णा, इथे कुठे आज!?' असं म्हणत माझ्या पाठीवर त्यांचा भला मोठा पंज्यानी माझं अक्ख २०-२५किलोचं अंग 180°ने वळवत, घराच्या मागच्या दरवाज्यापाशी नेले, जवळच असलेला हिरवा जाडा पाइप हातात घेऊन पंप चालू केला, दीड इंचाचा त्या पायपातुन जिवंत साप तगड्या हातांत घेतल्यावर जसा तडफडेल अगदी तसाच तो पाइप काकांच्या हातात... पाणी फोर्सनी बाहेर आले, थेट काकांच्या पायावर... पायवारुन समोरच्या झाडांवर, मला विचारलं ( विचारलं म्हणजे काय...डोळ्यांनी इशारा केला, पाय धुवायचेत का!? ) मी ही काही न बोलतानाच (नकारात्मक) मान हलवली, ते हसले, दरवाज्याच्या जवळच एक फणस ठेवलेला, त्याला बघुन 'खाणार का!?' हे ऐकून मी (सकारात्मक) मान हलवली!
तो भला मोठा फणस, अगदी सहज उचलला आणि आम्ही घरात शिरलो, ट्यूबलाइट लावली, १० सेकंद लागले ती ट्यूबलाईट पकपकत लागायला... त्यांच्या घरी त्यादिवशी पहिल्यांदाच असा 'प्रोप्पर' आत गेलेलो!
त्या घरात २ खिडक्या, त्या खिडक्या सोडल्यातर क्वचीतच भिंत दिसेल इतकं सामान, पुस्तकं, हार्डवेअरची सामानं, आणि भिंत मोकळी जिथे जिथे पोस्टर्स/फोटोज तिथे तिथे! जळमटं पण होती पण फक्त जीथे हात पोहोचत नसेल तिथेच, स्वयंपाक खोली आणि एक मोठी रूम आणि त्यालाच लागून एक बेड असलेली छोटी रूम, त्यालाच मुख्य दरवाजा. माझं पुस्तकांकडे... एक चित्र-शब्दकोष होता इंग्रजी, चांगले जाडजुड ५भागांचा संग्रह! मस्त जाड पुठ्ठा असलेले मुखपृष्ठ, आकर्षक चित्र आणि ईंग्रजीत A-F, F-K... अशी विभागणी असलेला संच! बापट काका आले जवळ, मला तो संच काढून दिला म्हणाले, "माझ्या नतवंडांसाठी जपून ठेवलेत मी, तू घेऊन जा हो... पण परत आणून दे!" मी त्यांच्याकडे पाहुन हसलो! हातात न मावणारी आणि पेलवणारी तो संच घेऊन घरी आलो! त्या दिवशी उरलेली अक्खी दुपार (नंतर अक्खी उन्हाळ्याची सुट्टी) ती पुस्तकं बघण्यात घलवली, काय मस्त क्वालिटी होती, अप्रतिम चित्रं, नक्कीच खुप महागातली असणार, बापट काकांनी मला बघायला/वाचायला दिली ह्यावर विश्वासच बसेना!
संध्याकाळी आजी बरोबर परत गेलो, तेव्हा माझा टायर, काठी, कापलेला फणस आणि बापट काका माझी वाट पहात होते, नेहमी प्रमाणे विचारपुस करून झाली आजीकडे, हे असे रोज चालू असायचे.
बापट काका म्हणजे एक मेहनातीचे भण्डारच होतं... बहुदा ते मुंबईत राहत असावेत, पण त्यांचा जीव इथे आक्षीत, इकड्च्या वाडीत, फुलापानांत... त्याची शरीरयष्टीही उत्तम! वयाच्या ७०रीत ही योगसाधना वगैरे त्यामुळे तल्लख बुद्धी... बायको हयात नसेल, नाहीतर दिसली असती कधी ना कधी, मुलं अमेरीकेत, त्यामुळे एकटा जीव सदाशिव! आता कुठे असतील देवास ठाऊक!
पुढे नंतर कधी भेट झाली नाही, आजोबा गेले... नंतर आजीही एकटी असल्यानी आक्षीत कमीच असायची, माझं गावाला जाणं जवळपास बंदच झालं, आजी वरल्यानंतर तिथले घर-वाडी दोन्ही विकले, आता तिथे फक्त आठवणी राहतात. मध्ये मी आणि आई गेलेलो... आमच्या घराच्या ठिकाणी एक आलिशान बंगला बांधलाय... पाय नकळत बापट काकांच्या घराकडे वळले.
मुख्य फाटकाला कुलुप होते, साफसफाई ही केलेली नव्हती...म्हणजे खुप दिवसात/महिन्यात तिथे कोणाचे वास्तव्य नव्हते हे जाणवत होते. मी स्वतःशीच बडबड करत कुंपणातून आत घुसलो..."कुठे असतील बापट काका?… त्यांनी दिलेला संच परत केलाच नाही!" तितक्यात कोणतरी मागे आहे असे वाटले, म्हणून लगेच वळून पाहिले खरे!… पण कोणीच नव्हते.
प्रश्न अजून ही पडतो… परत भेटतील का 'बापट काका'?परत भेटतील का 'बापट काका'?
#सशुश्रीके | २३ ऑगस्ट २०१५
Very nice start to the story. Waiting for the next part.
ReplyDeleteNice story
ReplyDelete