मो आरम (Mo Aram)

हा 'मो' म्हणजे मोहम्मद
त्याला सगळे मो म्हणायचे... म्हणायचे कशाला अजुनही म्हणतात, 'मो आरम' त्याचं ऑफिशल ईमेल ऐड्रेसही ह्या नावानीच आहे, तो धर्माला जास्त मानत नाही, त्यामुळे असेल बहुतेक, मोहम्मदच्या ऐवजी 'मो' म्हणवुन घेतो..(असा माझा अंदाज आहे, नक्की काय कारण माहित नाही) मुळचा इराणचा, घरी ८की९ भावंडं, हा एकटाच परदेशात राहतो. घरच्यांशी काही ख़ास संबंध नाहीत, कसे असतील हो? ८-९मुलं कोणाकोणा कडे लक्ष्य देणार आई-वडील?
हे सगळं मला त्यानी सांगितलं, कधी!? सांगतो, सांगतो...

मी जेव्हा ओफ्फिस कामा निमित्त दुबईतून अबुधाबीत १आठवडा गेलो होतो आमच्या एजेँसीच्या अबुधाबी कार्यालयात, तेव्हा ओळख झाली, सेवन-अप चा फिडो-डीडो आठवतो का तुम्हाला? अगदी तसाच, उंचपूरा, शून्य चरबी, कंठ नाकाएवढा बाहेर आलेला, नुकतीच मिसुरडी फुटलेला, दाढीचा पत्ता नाही... छोटे केस, कायम हसरा चेहरा, तेव्हा २०-२१वर्षाचा असेल (२०१०-११च्या आसपासचा काळ) डेस्क समोर दोन स्क्रीन, हातात वैकॉमचे पेन. १-२दिवसानंतर कळालं की हा येडा बहुतेक वेळा ऑफिस मध्येच झोपतो, वर्कलोड (एडवरटाइजिंगचा वर्कलोड म्हणजे न संपणारा) आणि राहायला दुबईत असल्यानी घरी जाऊन परत येण्यात वेळ जाइ! (दुबई-अबुधाबी म्हणजे आपल्या मुम्बई-पुणे सारखं अंतर) मी आठवडाभर दुबई-अबुधाबी केले,काही दिवस माझ्या गाडीतून... काही दिवस टैक्सी काही दिवस प्रायव्हेट टैक्सीतुन, ज्या टॅक्सीतुन तो यायचा त्याच टैक्सीमध्ये त्यानी आपली कहाणी सांगितली, सांगितली म्हणजे मी विचारात गेलो आणि तो सांगत गेला.. अह्हो मी काय शांत बसणाऱ्यातला नव्हे, लोकांच्या सुख-दुखाच्या गोष्टी ऐकून घ्यायला आवडतं, आणि समोरचा तसा दिलखुलासही असला पाहिजे म्हणा, आणि मो तसा आहे. त्याला बोलायला खुप आवडतं, बघावं तेव्हा 'ऐकणाऱ्याला' शोधत असतो तो, मी कान आणि मन ठेवतो रिजर्व्ड करून त्यासाठी... आणि खुप कामात असेन तरी बाजूला ठेऊन ऐकतो, कारणतो जे बोलतो ते इतकं हटके आणि मुद्देसुद असतं, की बस्स! पण कधी कधी अटेच लागलेली असत, तेव्हा दुर्लक्ष्य करण्याशिवाय पर्याय उरत नाही!

असो, त्याच्या विधानाला/विचाराला प्रतिप्रश्न केला की उत्तर हजर, अणि जर उत्तर नसेल तर.. नाही नाही.... असं कधी झालच नाही, त्याचा अभ्यास इतका दांडगा की साला भल्या भल्यांना नमवेल, बरं हे सर्व असलं तरी काडी मात्र उग्रपणा नाही की आवाज वाढवणं नाही, जे काही सांगायचय किंवा पटवून द्यायचय, सरळ नीट शांतपणे मृदु आवाजात! त्याच्या कल्पनांना आव्हान द्यायचं म्हणजे तुमची पातळी उघडी होते! त्यामुळे मी हल्ली वाह वाह करतो आणि गप बसतो, पण काय काय कल्पना असतात त्याच्या, गूगल-ग्लास हा प्रकार येण्या आधीच मो ने त्या टेक्नोलॉजी बद्दल स्वप्न रंगायला सुरुवात केलेली, अशी बरीच उदाहरणे आहेत! आता सांगत बसलो तर मी बोर होइन, तुम्हाला सुद्धा बोर करेन, ऐक्झक्ट्ली... हेच म्हणतात सगळे, बोर होतात लोकं कारण त्यांना मो जे बोलतो त्यात जास्त रस नसतो किंवा वेळ नसतो. वयानी लहान आही, तरी आर्ट डिरेक्टर आहे, मी ही त्याच्या वयाचा असताना आर्ट डिरेक्टर झालेलो, पण आयडीएशन काय खायचं काम नाही, मी डीझाइनिंग कडे वळालो... डोक्याचा शिमगा का करायचा त्यापेक्षा जमतं ते कारावं! पण हा पठ्या भलताच टैलेंटेड, डीझाइनिंग आणि आर्ट डिरेक्शन + आयडीएशन सर्वच विभागात साहेब कमी वयातच 'ले भारी' लेवलला पोचलेले, त्याला पाहुन खरच कौतुक वाटत, अहोरात्र ऑफिस मध्ये, अहो वीकेंडला सुद्धा! काम नसेल तर भविष्यात उपयोग होईल असे काही शिकायला 'मो' बघावं तेव्हा त्याच्या डेस्क वर! 

हे जे काही तुम्हाला सांगितले हे सर्व २०१०च्या आठवड्या भरातललं नाही बर का, तेव्हा तो एक जूनियर होता, नंतर मी 'इम्पैक्ट बीबीडीओ दुबई' सोडून 'ऍफ़पी-सेवन दुबई' ला जेव्हा रुजू झालो तेव्हा 'मो' नुकताच 'जेडब्लूटी दुबई'तुन 'ऍफ़पी-सेवन दुबई'ला रुजू झालेला... आता तो ज्यूनियर नव्हता, स्वतःच केबिन असलेला मो आरम!
जाम अभिमान वाटतो त्याचा, आणि कधी कधी रागही येतो, किती ते काम काम!? 'वेर्कोहोलिक'चं उत्तम उदाहरण... त्याची कॅबिन म्हणजे त्याचं घरच जणू, फ्रिज, म्यूजिक सिस्टम, ड्रायफ्रूट्स वगैरे आणि जिमनॅस्टिक साठी जो मोठा बॉल असतो ना... नेमकं नाव नाही आठवतय, तो... तो बॉल ही आहे, मी आपला जातो कधी कधी पाठ दुखायला लागली की त्यावर रेळायला! 

त्याचा मध्यांतरी प्लान होता की कैनडात जायचं तिथे सेटल व्हायचं वगैरे, काही कारणास्तव त्यानी तो प्लान कैंसल केला, आता दुबईतच राहणार असं म्हणतो.. अजुन काय सांगू ह्याच्याबद्दल.. बघावं तेव्हा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेण्यात उत्सुक, 'सेल्फ-लर्नर' म्हणतात ना अगदी तसच... बरच काही शिकता येतं त्याच्या कडे पाहुन!
हा माणूस अजुन ३-४वर्षानी खुप मोठा झालेला असणार, त्याची शिकण्याची जिद्द अशीच कायम राहो, त्याला यशाचं शिखर लवकरात लवकर मिळो असं नेहमी चिंतितो मी, आणि आपल्या प्रत्येकात हा 'मो' थोड्या-फार प्रमाणात असावा असे प्रार्थितो मी. 

चला झोपतो मी, त्याचच काम करायचय उद्या, एक-से-एक असतात त्याच्या कल्पना, त्याच्या साठी वीना नाटक काम करणार मी :)

#सशुश्रीके | ३ ऑगस्ट रात्रीचे १.२३

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...