आठवणी!

॥श्री॥

फुंकर मारत पाणी गरम केले आहे का कधी!?
त्या चुलीत जळणारे नारळाचे काथे लालबूंद करत करत... तोंडात ब्रश... तंद्री!
अगदी पहाटे, सूर्योदय होण्याच्या ही अगोदर
कधी येणार तो दीवस परत अस झालय!

पानगी खावीशी वाटत्ये...मस्त खमंग...
त्यावर सरसरीत गरम तूप... केळीच्या पानावर
आजीच्या हाकेसकट... पडवीत झोपाळ्यावर
पावसाची रपरप बघत!

त्या उन्हाळाच्या दुपारी आजीचा डोळा लागलेला आजोबा गोठ्यात अन मी झोपाळयावर...
एका हातात दोरी, दुसरा हात जमीनीवर, ते बोट खरवडत नखांचा आवाज करत, लक्ष्य हळूच कलडे वाळत घालण्यासाठी अडकवलेल्या बांबूवर, पाहूण्या सारखा भुंगा बाहेरून पडवीत, त्याच्या आवडत्या बांबूवर गुफ्तगू, झिंग झुंग असा तो, ऐकवेना, मी कुस बदलली, दुसऱ्या हाताला दोरीची जवाबदारी देत पहिला हात जमीनीवर, आता डोळे झोपाळ्याच्या मागच्या खिडकीवरुन कौलांकड़े, या कौलांमध्ये एका कौलाच्या जागी फ्रॉस्टेड काच., ज्यातून दैवी प्रकाश आत यायचा, धूलीकण चा क्यालीडोस्कोप दाखवायचा, चटपट पाली मध्येच लक्ष्य वेधायच्या, जळमटांच्या बाजुनी पळायच्या, कोणीतरी जणू 'स्टेचू' म्हणून थाम्बवल्या सारख्या गोठायच्या काय परत पळायच्या काय... त्यात हळू हळू डोळे मिटायला लागायचे, हाततली दोरी जागा सोडायची, परत उठल्याशिवाय घेता नाही येणार इतकी लांब जाऊन रुसायची, आता फक्त झोपाळ्याचा आवाज, बाहेरच्या किड्यांचा, रास्त्यावरच्या चपलांचा आवाज, सर्व आवाज कमी कमी होत मग आवाज यायचा स्वतःच्या श्वासाचा, आवाज ही हळू हळू ऐकेनासा, झोपळा शांत, घामाच्या धारा, हळूच गार वारा, पचाक् करून मानवर चापटी मारतो डोळे उघडतो हळूच, समोर आप्पा, हातात पेपर, डोळ्यात चश्मा, जाग येऊ नये मला म्हणून घालत होते वारा, डोळे परत बंद, तो दुपारचा काळोख श्रीमंत!

तो वारा अजुनही अनुभवतो, अगदी आत्ता ही,
कैद आहे माझ्या अवती भवती, चोरून घेतो, कधी हक्कानी, अजुन ही आहे तीथेच तो झोपळा आहे तीथेच ती पडवी, अजुनही पाहुणा तो भुंगा, अजूनही अजूनही...

#सशुश्रीके | २०/०२/२०१५ | १२:४३










Radhika Date - अर्रे कित्ती रे जिवंत केलंयस चित्रण.माझंही काहीसं असंच.फरक इतकाच की लांबवर कच्चा रस्ता.त्यामुळे आसपास फक्त निसर्गदत्त आवाज.जेंव्हा भुंगा बघेन तेंव्हा भितीनी कानात बोटं.डोळे भुंग्याचा पाठलाग करणारे.पालथं झोपून एक हात जमिनीवर कधी कधी एक पाय सुद्धा.अाज्जी मला म्हणायची झोपाळ्याचं कूळ.इतका आवडायचा झोपाळा.

Pradnya Sane - आमच बालपण ही झोपाळयावर गेल पण ते उत्साहाने फसफसणार होते ..
झोपाळयावर इतके निवांत शांत होता येत होते हे आजच कळल .

Parashuram Korade - स्मरणरंजन… जालीम प्रकार!!!


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!