'माळा'

'माळा'

हो... माळा, पूर्वी सगळयांच्या घरी असायचा!
काय आकर्षण होतं त्या माळ्याचं माझ्या आयुष्यात!

ज्या ज्या गोष्टी लपवायच्यात त्या सर्व माळ्यावर
माझा डोळा अखंड माळ्याकड़े,
सकाळी दात घासताना,
आई कपडे वाळत घालतना,
त्या पैसेजचं ते काळोखी वातावरण,
दिवसा ढवळ्याही लाइट लावावा लागायचा!
तिथेच बेसिन
तिथेच वॉशिंग मशीन
तिथेच कपडे वाळत घालायच्या दोऱ्या
आणि त्या दोऱ्यांच्या बाजुलाच तो माळा!
सोनी, नेशनल, पैनासोनिक चे बॉक्सेस त्यात खजाना,
बाबांच्या कंपनीची एक्वीपमेंट्स,
जुन्या कैस्सेट्स, माझी जुनी खेळणी,
एक मोठा सिंथेसायझर,
न लागणारी भांडी,
त्यात लहान पाण्याची टाकी,
ती टाकी साफ़ करायला वर चढायचो कधी कधी मग... मजा!

एकदा आई बाबा गेले होते बाहेर,
मित्राला मदतीला बोलावलं,
म्हणालो चल पियानो वाजवु आज.. धमाल...
त्या पियानो वरती ड्रम्स वाजवायला काय मजा यायची!
आम्ही तो कसाबसा काढला, उघडणार तेवढ्यात बाबांच्या स्कूटरचा आवाज आला,
मी म्हणालो 'आदेश... आले वाटतं आई बाबा... '
आणि किमान पंधरा ते वीस सेकंदात अगदी चार्ली चैप्लिनपेक्षा फास्ट चपळतेने
आम्ही तो पियानो बॉक्स मध्ये ठेऊन अक्षरशः फेकला माळ्यावर!!!
आणि तो बसला ही छान ज्या स्थितीत ठेवलेला तिथे!
छातीत ड्रम वाजत होते... पियानो ऐवजी!

अश्या कितीतरी दुपारी माझा डोळा लागायचा नाही,
लागायचा तो माळ्यावर, त्या गोष्टींवर!
एक लहान टीवी पण होता माळ्यावर,
अगदी तीन इंच स्क्रीन असलेला! त्याला एंटीना,
काय गिम्मिकि होतं सगळं एकूणच!
बाबांना टेक्नोलॉजीची भयंकर आवड आणि त्यात परदेशात असल्यानी
तिथे मिळणे सहज शक्य! मग मी मित्रांमध्ये बढ़ाया मारणार,
कारण हां सर्व प्रकार नुसते ऐकायचच माहित्ये,
पण मी हातात आणून दाखवायचो, त्यामुळे आपला लै वट होता.

त्या माळ्यावर चढायला म्हणजे तो 'घोड़ा' लागायचा, डुगडुगणारा...
एकटं चढायचं म्हणजे महा-ऐडवेंचरच... आणि वरुन उतरताना तो एक इंच लांब असायचा,
की मग माळ्यावरच्या त्या कठड्यावर हाताचे कंपन आणि पायच्या बोटांची शर्थ लागून कसाबसा उतरायचो, पडायचो!
पायाला झीणझीण्या... डोक्याला टेंगुळ... काय विचारू नका,
आपल्या मित्रानीच आपल्याला मारलं - चुकून तर आपण काही बोलत नाही तसा तो माळा ही!
कितीही अंधार, कितीही अडगळ, धूळ माती... जळमटं असली तरी जीवाभावचा माळा!

अजुनही घरी गेलो की माळ्याला भेट देतो,  पण आता मात्र त्या गोष्टी फेकायला, भंगारात द्यायला,
ती प्रत्येक गोष्ट फेकताना जड़ होतं मन... भंगारात किलोभर आणि मनात टनभर वजन भरतं,
त्या सगळ्या उनाड, खट्याळ, रीकामटेकड्या दुपार आठवतात!

माळा.. miss ya re! 

‪#‎सशुश्रीके‬ | २ जानेवारी २०१५, सकाळचे १०.३९

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...