आईने दरवाजा उघडला

त्या समोरच्या राखाडी फळ्यावर ची अक्षरं नाचायला लागली
हातातली पेन्सील तोंडात चावून रबराचा तुकडा पडला खाली
मधली सुट्टीची घंटा वाजली
मी दप्तर उचललं गपचूप कोणाला न सांगता
शाळेच्या पायर्यांवरनं अलगद फाटका बाहेर
मोशन ब्लर गाड्या
दप्तर हळू हळू पाठीवरून कंबरेवर
चालत चालत मध्येच वेग कमी जास्त
जंगली महाराज रोड - मोडर्न कोलेज - पोलिस लेन… रस्ता संपायचं नाव घेत नव्हता
वडार वाडीच्या बाजुचा क्येनॉल चा ओबड धोबड रस्ता पकडला
आता कंबरेवरचं दप्तर ढूंगणा पर्यंत
घामाघूम मी
शोर्टकट ची कुम्पणं, पाला पाचोळा, पाइपं, दगडी
आणि अजून काही नको नको त्या प्रकारांचा अडथळा पार करत
एकदा दिसली आमची बिल्डींग
आत्ता ३रा मजला! प्रचंड धीर करत एक एक पायरी…
चेहरा प्रचंड लाल… कानात्नं धूर, कसाबसा हाताची मुठ घट्ट घट्ट करत
दरवाजा
धाड धाड धाड
आई आई…
आईने दरवाजा उघडला
माझा चेहरा पाहून आई 'काय झालं? आत्ता घरी कसा आलास तू!?'
मी आईकडे बघून… दप्तर सोडलं…

'झाली!'


#सशुश्रीके | १५ सेप्टेम्बर २०१४ / दुपारचे ५.०९

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!